पिंपरी : शिवसेनेत बंड झाल्यानंतर हळूहळू धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांच्या (ता.१८) घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावून त्यांना समर्थन दिले. त्यात पिंपरी चिंचवड येथील मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासदार बारणे यांच्या घरासमोर पोलीस संरक्षण लावण्यात आले आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी केलेले शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित राहून एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एक विद्यमान खासदार, माजी खासदार व माजी आमदार यांनी शिदेना पाठींबा देत ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा सुरुंग लावला आहे.




