पिंपरी (प्रतिनिधी) केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ही दरवाढ कमी न केल्यास भविष्यात त्याविरुद्ध मोठा संघर्ष उभा राहील. भाजपाच्या राजवटीत आधीच महागाईने थैमान घातले आहे. त्यामध्येच आता जीएसटीत होणारी दरवाढ ही लुटीचा डाव असल्याची सणसणीत टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सतत वाढत चाललेली महागाई रोखली गेली नाही. महागाई संपवू असे आश्वासन देणार्या भाजपा राजवटीत महागाईने थैमान घातले असून नोटबंदी, जीएसटीने आता जनता हैराण झाली आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल शंभरी पार गेली आहे. बहुतेक लोकांचे हातावर पोट असते. त्यांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे.
भारतासह जगभरामध्ये गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे सर्वजण अद्यापही हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. या कोरोना महामारीमुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लाटेने तडाखे द्यायला सुरूवात केली. चौखूर उधळलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गरीबांचे जगणे आणखीन कठीण करणारे झाले. टाळेबंदीनंतर घरगुती गॅस सिलेंडरची एक टाकी हजार रूपयांच्या घरात गेली. गेल्या साडेसात वर्षात अर्थात 1 मार्च, 2014 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत रू.410.50 एवढी होती. ती आता नोव्हेंबर 2021 मध्ये 1 हजार झाली. या बरोबरच विविध वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल आहे.
त्यामुळे आरोग्य, शिक्षण, जीवनाविषयक वस्तूंवरची वाढीव जीएसटी त्वरित कमी करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा, इशारा सतीश काळे यांनी दिला.



