- सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांच्या मागणीची प्रशासनाकडुन दखल
पिंपरी (प्रतिनिधी)– निगडी मधील सेक्टर २२ मधील अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तसेच जनसंवाद सभेत वारंवार याविषयी तक्रार केली होती, याचीच दखल घेत आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी निगडी सेक्टर २२ मधील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची पाहणी केली व लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश प्रशासनाला यावेळी दिले.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे की, “काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या निगडीतील सेक्टर २२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. सध्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. दोन चार दिवसाच्या पावसामध्येच येथील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. अजून संपुर्ण पावसाळा जायचा आहे. निगडी सेक्टर २२ मध्ये असा एकही रस्ता नसेल ज्याला खड्डे पडले नसतील, उच्चभ्रू भागात ज्याप्रमाणे कामाची गुणवत्ता असते त्याप्रमाणात याठिकाणी जाणूनबुजून भेदभाव करत कामाचा हलका दर्जा देण्यात येत आहे.
रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्ड्यावरून आपल्याला याठिकाणी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची गुणवत्ता व दर्जा कळू शकेल. याप्रकारामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. मागील कित्येक पावसाळ्यात छोटे-मोठे अपघात हे खड्ड्यामुळे होत आहेत पण याकडे प्रशासन एखाद्याचा जीव गेल्याशिवाय गांभीर्याने घेत नाही. गेल्या अनेक वर्षापासून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सुरू आहे. याला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचे आहे. तरी आपण या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून निगडी सेक्टर २२ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे तसेच आवश्यक तेथे रस्ता दुरुस्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.




