पिंपरी – आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करून आखाड साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात आखाड ‘इव्हेंट’ झाला आहे. त्यातच आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक येत असल्याने यंदाचा आखाड पार्टीचा राजकीय जोर कमालीचा वाढला आहे. आपल्या प्रभागातील कार्यकर्ते, नागरिक, युवा कार्यकर्ते, सोसायटीमधील चेअरमन, अधिकारी, ठेकेदार, व्यावसायिक हितसंबंध असणाऱ्या सर्वांसाठी राजकीय नेत्याकडून आखाड पार्टीचे रंगीत संगीत जोरदार आयोजन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
श्रावण महिना सुरू होण्यास एक आठवडा बाकी असताना शेवटचा आठवडा हा आखाड पार्ट्यासाठी पर्वणी ठरणार आहे. आखाड अंतिम टप्प्यात आला असून, विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची मोठी गर्दी होत आहे. शेतांमध्ये, फार्म हाऊसवर ही पार्ट्या रंगू लागल्या आहेत. निगडी, आकुर्डी, दापोडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, रहाटणी, रावेत, चिखली-तळवडे, मोशी-जाधववाडी, भोसरी इंद्रायणीनगर, चऱ्होली, डुडुळगाव आणि मावळ तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात मांसाहारी हॉटेल मध्ये मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे.
काही हॉटेलमध्ये ‘आखाड पार्टी मेन्यु’ ठेवला आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच मावळ, वडमुखवाडी, चऱ्होली, डुडुळगाव, कासारसाई, माण, मारुंजी, जांभे अशा शेतांमध्ये पार्ट्या रंगू लागल्या आहेत. तुपातलं मटन, गावरान कोंबडा, तांबड्या आणि काळ्या रश्श्यातील मटण, मटण-चिकन दम बिर्याणी, तंदूर, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधून मागणी वाढली आहे. तर अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटण भाकरीवर ताव मारला जात आहे. गुरुवारी (ता.२८) गटारी अमावस्या आहे. आता उर्वरित आठ दिवसांमध्ये मांसाहारी जेवणावळींचा जोर आणखी वाढणार आहे.




