पुणे, दि. 23 – ज्या मार्गांवर प्रतिसाद कमी आहे, त्या मार्गावरील पीएमपी बसेस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीच्या शहर आणि शहराबाहेरील मार्गांचा आढावा प्रशासनाने नुकताच घेतला. तर, गर्दीच्या मार्गांवर बस वाढवण्याच्या हालचालीही प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
शहरातील प्रवाशांची वाढती संख्या आणि मार्गावरील बसेस यांचे योग्य नियोजन करण्यासाठी आगार प्रमुखांची नुकतीच बैठक पार पडली. यात काही मार्गावर प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे त्या मार्गावरील बस बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीपूर्वी प्रत्येक मार्गावरील वाहकांना त्यांच्या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणि मार्ग सुरू अथवा बंद करण्याविषयी माहिती आगार प्रमुखाला कळवायची होती.
वाहकांनी सुमारे तीन हजारांहून अधिक सूचना कळविल्या आहेत. या सूचनांचा विचार करून आर्थिक तोट्यात असलेले काही मार्गावरील बसेस बंद केल्या जाणार आहेत. तर काही मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना बससाठी तासन्तास वाट पहावी लागणार नाही आणि प्रवाशांना जलद प्रवास करण्यासाठी मदत होणार आहे. पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात असतानाच आर्थिक नुकसान कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.




