नवी दिल्ली : युरोपमध्ये आढळलेले ‘सुपर-स्प्रेडर’ आणि देशामधील रुग्ण वेगळे आहेत, असे भारतात आढळलेल्या मंकीपॉक्सच्या पहिल्या दोन प्रकरणांमधील नमुन्यांच्या आनुवंशिक अनुक्रमावरून दिसून आले आहे. यावरून हे दिसून येते की विषाणूचा एक वेगळा प्रकार आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथील शास्त्रज्ञांनी, GISAID या जागतिक विज्ञान उपक्रमाच्या संशोधकांसाठी सार्वजनिक डेटाबेसवर मंकीपॉक्सचे आनुवंशिक अनुक्रम अपलोड केला आहे.
सध्या ७५ देशांमध्ये पसरलेल्या २० हजारांहून अधिक मंकीपॉक्स प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे युरोपमधील ‘सुपर-स्प्रेडर’द्वारे पसरल्याचे मानले जात आहे. तसेच २०२२ मध्ये आढळलेले बहुतेक रुग्ण ‘B.१’ नावाच्या स्ट्रेनशी संबंधित आहेत. जगभरातील प्रकरणांचा एक छोटा समूह वेगळ्या प्रकाराशी ‘A.२’शी संबंधित असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत अनुक्रमित केलेले मोजकेच नमुने ‘A.२’चे आहे, असे सीएसआयआर-आयजीआयबीमधील (CSIR-IGIB) जीनोमिक शास्त्रज्ञांनी सांगितले. ‘A.२’ जीनोम यूएस आणि थायलंडमधील आहेत. ते युरोपशी संबंधित कोणत्याही घटनांमधून उद्भवलेले दिसत नाही, असे आयजीआयबीचे सह प्रमुख जीनोमिक शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी सांगितले.
केरळमध्ये आढळलेले रुग्ण ‘A.२’ या प्रकाराचे आहे. ‘A.२’ प्रकरणाशी संबंधित काही प्रकरणांचा संबंध मध्य पूर्व किंवा पश्चिम आफ्रिकेशी संबंध असल्याचे दिसते, असे विनोद स्कारिया म्हणाले. यूएसएमधील सर्वांत जुने नमुने २०२१ मधील आहे. जे सूचित करते की हा विषाणू बऱ्याच काळापासून आणि युरोपियन घटनांपेक्षा पूर्वीच्या काळात पसरला आहे, असेही ते म्हणाले.




