पिंपरी : महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचार व सुविधा करीता केलेली वाढीव दरवाढ तातडीने मागे घेण्याच्या आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी आज (गुरुवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, प्रशासक राजेश पाटील यांनी केलेली रुग्णालयातील दरवाढ मागे घ्यावी. रखडलेले शालेय साहित्य तातडीने वाटप करावे. स्वराज्य इंडियाचे मानव कांबळे यांनी येत्या 1 ऑगस्टपासून रुग्णालयीन दरवाढ लागू केली. तर, 2 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी महापालिका प्रशासक राजेश पाटील यांच्याविरोधात नागरी समस्या निवारण समिती व शहरातील समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, समिती समन्वयक मारुती भापकर, स्वराज्य इंडियाचे मानव कांबळे, माजी नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, छाया देसले, वर्षा जगताप, वेलफेअर पार्टीचे सालारभाई शेख, एमआयएमचे धम्मराज साळवे, प्रकाश जाधव, प्रदिप पवार, काशिनाथ नखाते, सुरेश गायकवाड, सतिश काळे, प्रविण कदम, नीरज कडू, सुनिता शिंदे, युवराज पवार सहभागी झाले होते.




