पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 38 (वाकड) मध्ये नव्याने एससी पुरूष, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे मा. नगरसेवक राहूल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे कलाटे बंधूना नव्याने आरक्षण सोडतीमध्ये त्याच्या राजकीय कारकिर्दीस कलाटणी मिळाली आहे.
आता दोन्ही कलाटे बंधूंना शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. आज शुक्रवारी (दि. 29) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये शहरातील काही मातब्बरांना माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. त्यामध्ये राहूल कलाटे, सचिन चिखले, राजेंद्र जगताप यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. नव्याने ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आरक्षणात बदल झाले आहेत.
वाकड प्रभाग क्रमांक 38 मध्ये ओबीसी आरक्षणासह आज काढण्यात आलेल्या सोडतीनुसार या प्रभागातील एक जागा ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे. दुस-या जागेवर एससी पुरूष आणि तिस-या जागेवर सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागेसाठी तयारीला लागलेले राहूल कलाटे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना या प्रभागातून प्रत्यक्ष निवडणूक लढवता येणार नाही. यामध्ये सर्वसाधारण महिला या जागेवर मयूर कलाटे यांच्या पत्नी माजी नगरसेविका स्वाती कलाटे निवडणूक लढवू शकतात. जर, ओबीसी कार्ड बाहेर काढले तर त्याठिकाणीही महिलाच उमेदवार द्यावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर महिला उमेदवार देऊन कलाटे बंधू यांना बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग 38 मधील राजकारणातून अलिप्त राहतील का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कलाटे बंधुसमोर आता दोन पर्याय ओपन….
प्रभाग क्रमांक 37 (ताथवडे-पुनावळे) आणि प्रभाग क्रमांक 39 (पिंपळे निलख-विशालनगर) या दोन्ही प्रभागात कलाटे बंधू चाचपणी करण्याची शक्यता आहे. कारण, 2017 च्या महापालिका निवडणुकीत ताथवडे पुनावळ्यात प्रतिनिधित्व केल्याने या ठिकाणी कलाटे बंधू यांचा संपर्क आहे. याठिकाणी ओबीसी पुरूष आणि सर्वसाधारण अशा दोन जागा सुटल्या आहेत. त्याठिकाणी दोघांपैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. तर, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख, पोलीस लाईन, विशालनगरमध्ये सर्वसाधारण पुरूष या जागेवर दोघा कलाटे बंधू पैकी एक जण लढत देऊ शकतात. दोन्ही कलाटे बंधू यांना शेजारच्या प्रभागात अतिक्रमण करावे लागणार आहे.
यात कस्पटेवस्ती विशाल नगर प्रभागात भाजपचे संदीप कस्पटे व विनायक गायकवाड या मातब्बर उमेदवारांशी दोन हात करावे लागणार आहेत तर मागील निवडणुकीत ताथवडे गावातील संदीप पवार यांना कलाटेबंधू यांनी आसमान दाखवल्यामुळे ते पुन्हा कलाटे यांना डोक्यावर घेतील का? याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे दोन्हीही कलाटे बंधू यांना आगामी महापालिका निवडणूक डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे.



