इंदापूर – राज्यात शिवसेनेत झालेलं बंड, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले ४० ते ५० आमदार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सघर्ष.. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरही होतो आहे. प्रत्येक जण या राजकीय परिस्थितीचा विचार करताना दिसतो आहे. यात इंदापूर परिसरातील एका शिक्षकाने नोकरीचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यापुढे शिवसेना पक्षाचे पूर्मवेळ काम करणार असल्याची घोषणाही या शिक्षकाने करुन टाकली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती पाठिंबा मिळतो आहे, हे यातून स्पष्ट दिसते आहे.
शिक्षकाच्या राजीनाम्याची चर्चा
दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख खरात यांच्या राजीनाम्यात आहे. खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ते नोकरी करीत आहेत. आता शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी खरात यांनी नोकरी सोडली आहे. शिवसेना संघटनेचे पूर्णवेळ काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.




