पिंपरी : वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा 265 कोटींचा आराखडा सध्याच्या शिंदे फडणवीस राज्य सरकारने रद्द केला आहे. सर्व शंभुप्रेमींच्या भावना दुखावणारा हा निर्णय आहे. हा आराखडा रद्द करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. तसेच त्याठिकाणी भव्यदिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. अन्यथा आगामी निवडणुकीत शंभुप्रेमी धडा शिकवतील,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी निवेदनाद्वारे दिला.
काळे यांनी निवेदनात नमूद केले की, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे. त्यांच्या शूर पराक्रमाच्या कथा अंगावर रोमांच निर्माण करणाऱ्या आहेत. शत्रूला नामोहरम करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. तसेच शंभूराजांकडे मैत्री भावना देखील होती. अशा कर्तृत्ववान राजांचा इतिहास महाराष्ट्रसह देशभरातील तरुणांच्या नसानसात भरलेला आहे. त्यामुळे त्यांचे भव्यदिव्य स्मारक होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक क्षेत्रातून उमटत होत्या. त्याची तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दखल घेऊन. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वढू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभा करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी तब्बल 265 कोटींचा आराखडा मंजूर केला. समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपयांची देखील मंजूरी दिली.मात्र नुकतेच स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने या दोन्ही आराखड्याला स्थगिती दिली आहे.
हि स्थगिती देणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्यासारखे आहे. हा अवमान करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातील शंभुप्रेमी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन आराखडा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा.अन्यथा शंभुप्रेमी शिंदे फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडतील,असा इशारा सतीश काळे यांनी दिला. वढू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारावे, त्याठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका तयार करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित योग्य पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी योग्य निधीची तरतूद करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष सतिश काळे कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे सचिव संजय जाधव उपाध्यक्ष नितीन जाधव संघटक मंगेश चव्हाण यांच्या सह्या आहेत.




