लोणावळा:- लोणावळ्यात जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटून बाहेर आल्यावर ओल्या अंगाने तलावाच्या कडेला असलेल्या लाईटला हात लावल्याने मुंबईतील एका १३ वर्षाच्या बालकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंन्ट बंगल्याच्या जलतरण तलावात घडली. लोणावळ्यात जलतरण तलावात अशाप्रकारची १५ दिवसातील हि दुसरी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हरुन मसुद वाली (वय-१३, रा. भायखळा, मुंबई ) असे जलतरण तलावाच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहमद साजीद खान (वय- ५६, रा . भायखळा, मुंबई ) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहमद खान व त्यांचे नातेवाईक हे लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंन्ट व्हिला या बंगल्यात गुरुवारी दुपारी आले होते. रात्री साडेआठ च्या सुमारास खान व त्यांच्या बहिणींच मुले हि या बंगल्याच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटत तलावात मध्ये खेळत होती. त्यावेळी हरुन याने खेळता खेळता जलतरण तलावाच्या पाण्याच्या बाहेर च्या बाजुला असलेल्या एका विजेच्या खांबाला त्याने पकडले असता त्याला विजेचा जोरात धक्का लागल्याने तो मोठ्याने ओरडला व त्याचा थरकाप होऊ लागला.
यावेळी त्याच्या नातेवाईकांनी त्या ओढून बाजूला केले परंतु तो बेशुद्ध झाला होता. हरूनला नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खबर दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.



