लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित डॉ.बी.एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयास ‘राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद’ (नॅक) यांच्या समितीने भेट देऊन पार पडलेल्या पुनर्मुल्यांकन प्रक्रियामध्ये ‘ब’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. लोणावळा महाविद्यालयाद्वारे लोणावळा व ग्रामीण परिसरामध्ये आजवर दिलेल्या शैक्षणीक मूल्यांना सोनेरी किनार लागली आल्याने लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी, आजी व माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘नॅक’ तज्ज्ञ समितीने नुकतीच महाविद्यालयाला भेट देऊन सन २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीतील शैक्षणिक, संशोधनपर व सर्वांगीण प्रगतीबाबत महाविद्यालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे त्यातील तथ्यांची पडताळणी आणि मूल्यमापन केले. तसेच त्यांनी आजी-माजी विद्यार्थी, पालक व सामाजिक घटकांशी संवाद साधून त्यांनी महाविद्यालयास पुनर्मूल्यांकनांसह उत्तम श्रेणी प्रदान केली आहे. महाविद्यालय शैक्षणिक, संशोधनपर व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने करत असलेल्या कार्याची नोंद ‘नॅक’ने घेत असताना आजतगायात गुणवत्तेच्या बाबतीतील सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले आहे.
शिक्षणासोबत सर्वच क्षेत्रातल्या मूल्यांचे संस्कार करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढल्याचा विश्र्वास व्यक्त केला जात आहे. लोणावळा महाविद्यालयाच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र नय्यर, सचिव श्री. दत्तात्रय पाळेकर, खजिनदार श्री. विजय दर्यानानी, विश्वस्त व सल्लागार अॅड. नीलिमा खिरे, विश्वस्त दत्तात्रय येवले, विश्वस्त बंकिमभाई मिठाईवाला, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. दिगंबर दरेकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. अमर काटकर, डॉ. संदीप सोनटक्के, डॉ. नितीन बोडके, आयक्यूएसी समिती सदस्य, सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे कार्यकर्तृत्वाबद्दल लोणावळामधील सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.




