पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहराचा सन २०२१-२२ चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे आज सादर केला.
पर्यावरणातील मुख्य घटकांतील बदलांचा अभ्यास करुन विश्लेषण करणे, सद्य:स्थितीतील जैवविविधतेची स्थिती अधोरेखित करणे, पर्यावरणातील बदलांची कारणे व परिणाम यांचे मुल्यांकन करणे, पर्यावरणातील उपलब्ध संसाधने व त्यांची मागणी यांचे नियोजन करणे, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणे, नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा पर्यावरण धोरण विकासात सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देणे, भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांचा आढावा घेऊन धोरण निश्चिती करणे अशी या अहवालाची वैशिष्ट्ये आहेत.




