पवनानगर वार्ताहर : कोथुर्णे येथिल ‘त्या’ ७ वर्षीय बालिकेला न्याय मिळवण्यासाठी मावळ तालुका एकवटला असून आरोपीला व त्याच्या साथीदार आईला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी उमा खापरे यांनी मावळ वासियांसह सर्वपक्षीय नेत्यांनी आज गुरुवार (दि. ४) रोजी पवनानगर येथे निषेध आंदोलनात केली.
या निषेध आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने महिला-युवक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत काळे झेंडे व काळी फित लाऊन कॅण्डल मोर्चा काढला. या नराधमाला फाशी झालीच पाहिजे व स्वराला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली.
याबाबत उमा खापरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व या गुन्ह्यातील आरोपीला भरचौकात फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना काल मावळ तालुक्यात घडली. या घटनेने मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा हादरला असून शिवछत्रपतींच्या पावन भूमीत, संतांच्या भूमीत असे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीच व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह आंदोलनकर्त्या मावळवासियांनी केली.
गणेश खांडगे म्हणाले कि आज संपुर्ण मावळ निशब्द झाला आहे अतिशय क्रुरतेने मानवी जातीला काळिमा फासणारी घटना घडली असुन आरोपीला गुन्हात मदत करणाऱ्या आईला देखिल सह आरोपी करुन लवकरात लवकर फाशी देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली.
यावेळी उमा खापरे, बाळा भेगडे, गणेश खांडगे, ज्ञानेश्वर दळवी, किशोर भेगडे, नितीन घोटकुले, सायली बोत्रे, सचिन घोटकुले, नामदेव ठुले, विश्वनाथ जाधव, माऊली आढाव, अमित कुंभार, संजय मोहोळ, ज्ञानेश्वर ठाकर आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली.




