लोणावळा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा: रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
ह्या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष पुर्ण होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीय नागरीकाने आपली देशभक्ती व्यक्त करण्यासाठी मोठया संख्येने या अभियानात सामील होत आपाआपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या अभियानाद्वारे आपण आपल्या मनात असलेली देशाविषयीची भक्ती, प्रेम, आदर, निष्ठा व्यक्त करणं हा या अभियानाचा मुख्य हेतु आहे.
आज शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता मावळा पुतळा चौकातून या ‘हर घर तिरंगा’ रॅलीची सुरुवात करण्यात आली. लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या रॅलीचा समारोप नगरपरिषद कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्वर, संजय घोणे, विशाल पाडाळे, ललित सिसोदिया, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संध्या खंडेलवाल, नारायण पाळेकर, लायन्स क्लबचे सदस्य आदींसह अनेकदा मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी उपस्थितांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाची देतानाच स्वच्छता अभियानाविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्वांनीच स्वच्छतेची शपथ घेतली.




