पिंपरी (प्रतिनिधी) – पवन मावळातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या सर्वाधिक वेदना महिला वर्गातून होत आहेत. या चिमुकलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट व पदाधिकाऱ्यांनी आज पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी पीडित मुलीच्या आईने माझ्या मुलीच्या 18 सप्टेंबर रोजी वाढदिवसादिनी त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्यासमोर बोलून दाखवली.
वयाच्या सातव्या वर्षी कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या नराधमांना मृत्युदंड शिक्षा द्यावी. तसेच या केसची सुनावणी फास्ट कोर्ट मध्ये घेऊन तातडीने शिक्षा व्हावी. अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, समिता गोरे (क्रीडा सेल अध्यक्ष), पूनम वाघ (विधानसभा उपाध्यक्ष), मिरा कदम (शहर उपाध्यक्ष), संगीता कोकणे (चिंचवड विधानसभा अध्यक्ष), सुनीता आल्हाट (प्रभाग अध्यक्ष) आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
कोथुर्णे गावातील घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात महिला व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी पिडीत मुलीच्या निवासस्थानी जाऊन चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार दिला.
यावेळी कविता आल्हाट आपल्या भावना व्यक्त करताना ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. आजही समाजात महिलावर अत्याचार करणारे राक्षस खुलेपणाने वावरत असून अशा राक्षसी प्रवृत्तीना कायद्याचा धाक बसावा यासाठी मृत्युदंड हीच शिक्षा देण्यात यावी. तसेच या घटनेची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेऊन मुलीच्या 18 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी त्या नराधमांना त्याच गावात फाशी द्यावी, अशी संतप्त भावना आल्हाट यांनी बोलताना व्यक्त केली.




