वडगाव मावळ – मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर स्थानिकांबरोबर वाद घालण्यात येत असून वाहनचालकांकडून स्थानिक ओळखपत्र दाखवूनही त्यांच्या गाड्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत. कागदपत्रे तपासायचे अधिकार आयआरबी च्या कर्मचार्यांना कोणी प्रदान केले. वाहतूक पोलिसांचे काम जर आयआरबी कंपनीचे कर्मचारी करणार असतील तर द्रुतगती महामार्गावर महामार्ग पोलिसांची नेमणूक कशासाठी करण्यात आली आहे. असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत.
महामार्गावरील टोलनाक्यावर स्थानिकांना टोल माफ करण्यात यावेत यासाठी तालुक्यातील नेतेमंडळी व विविध पक्षांचे पदाधिकारी अनेकदा आंदोलने करत आहेत पण तरीही याची दखल शासनाकडून किंवा सदर कंपनी कडून घेतली जात नाहीत.तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबीकडे गांभिर्याने पाहत या खासगी कंपनीस जाब विचारला पाहिजे. फक्त कर्मचार्यांचे हितसंबंध असणार्या लोकांनाच याठिकाणाहून टोल न घेता सोडण्यात येत आहे.
इतर स्थानिक लोकांकडून बळजबरीने टोल वसूल केला जात असून त्यांच्याकडे गाडी संदर्भातील कागदपत्रे मागण्यात येत आहेत. मुळात हा अधिकार त्यांना नसतानाही अशाप्रकारची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आयआरबी कंपनी व कागदपत्रे मागणार्या कर्मचार्यांवर शासनाकडून कारवाईची मागणी केली जात आहेत.




