लोणावळा : राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. त्यात आता सीएनजी देखील ८६ रुपयांवरून ९३ रुपये प्रतिकिलो वर येऊन ठेपला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल च्या किमतीत कपात करून नागरिकांना दिलासा दिला होता परंतु आता सीएनजी च्या दरवाढीच्या रूपाने तो दिलासा काढून घेतला आहे. एका हाताने दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले अशी स्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा शॉक नागरिकांना बसला आहे.
सध्यस्थितीत महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल डिझेल च्या दरात कपात झाली असली तरी इतर जीवनावश्यक वस्तू कमालीच्या वाढताना आपल्याला दिसत आहे. रोजच्या वापरात असणाऱ्या सीएनजी च्या दरामध्ये तब्बल ६ रुपयांनी वाढ झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या सीएनजी च्या दरामुळे ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीला सीएनजी दर कमी होता त्यामुळे सीएनजी च्या गाडयांना चांगलीच मागणी होती परंतु आता पेट्रोल व सीएनजीचा दर जवळजवळ सारखाच होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुर पाहायला मिळत आहे.
सीएनजीचा दर ८६ रुपयांवरून आता ९३ रुपयांवर पोचला असला तरी सीएनजी भरण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहायला लागत आहे. परिणामी प्रचंड वेळ लागत असल्याने सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे.
- सीएनजी, डिझेल आणि पेट्रोलचा वाढता दर.
सीएनजी २०२० – ५६ रू. प्रतिकिलो
सीएनजी २०२२ – ९३ रु. प्रतिकिलो
पेट्रोल २०२० – ८५ रु. प्रतिलिटर
पेट्रोल २०२२ – १०६ रु. प्रतिलिटर
डिझेल २०२० – ८७ रु. प्रतिलिटर
डिझेल २०२२ – ९२.८० रु. प्रतिलिटर
- दैनंदिन वस्तूंचे वाढलेले दर
शेंगदाणा – २०२० – ८० रु. प्रतिकिलो
शेंगदाणा – २०२२ – १२०
खाद्यतेल – २०२० – ८०
खाद्यतेल- २०२२- १९०
गॅस सिलिंडर – २०२० – ८०० रु.
गॅस सिलिंडर – २०२२ – १०६० रु.




