लोणावळा : पुणे- मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटात नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटे दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लोहमार्गावर पडलेली दरड काढण्यात आल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ शकली.
खंडाळा घाटात नागनाथ ते पळसदरी दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा खंडाळा, लोणावळा रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे गाडय़ा कर्जत रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या. दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.
दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ थांबली. दरड काढण्याचे काम करतानाच मध्यवर्ती मार्गिकेवरून काही गाडय़ा पुढे रवाना करण्यात आल्या. सकाळी दहाच्या सुमारास लोहमार्गावर पडलेली दरड पूर्णपणे हटविल्यानंतनर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.




