मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने संघटनात्मक पातळीवर बदल करताना प्रदेशाध्यक्षपदी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची शुक्रवारी नियुक्ती केली. मुंबई महानगरपालिका जिंकून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा निर्धार केलेल्या भाजपने शेलार यांच्याकडेच पुन्हा मुंबईची सूत्रे सोपविली आहेत.
भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तर मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने दोन्ही पदांवर नव्याने नियुक्त्या होणार हे निश्चित होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी नागपूरचे बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत केली.
बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने ओबीसी समाजातील नेत्याला संधी दिली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान बावनकुळे यांच्यासमोर आहे. तर शेलार यांची तिसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच शेलार यांच्याकडे महापालिका निवडणुकीपर्यंत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी राहण्याची शक्यता आहे.
२०१३ पासून २०२० पर्यंत त्यांनी मुंबई भाजपचे लागोपाठ दोनदा अध्यक्षपद भूषविले आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ८३ जागा जिंकून शिवसेनेच्या तोंडाला अक्षरक्ष: फेस आणला होता. शेलार यांच्या संघटन कौशल्यामुळेच भाजपने ३३ संख्येवरून मोठी झेप घेतली होती. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा भाजपला कमी मिळाल्या होत्या. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि शिवसेनेच्या गैरकारभाराच्या विरोधात शेलार यांनी सातत्याने आवाज उठविला होता. त्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला होता. गेल्या अडीच वर्षांत शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: मुंबईतील शिवसेनेच्या महापालिकेतील कारभारावर टीकेचा भडिमार केला होता. राज्याची सत्ता, शिवसेनेत पडलेली फूट हे सारे मुद्दे शेलार यांच्या पथ्यावर पडणारे आहेत



