पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली. आज ते मुंबईत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी आज गुरुवार (दि. 18) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आयुक्त आणि प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राजेश पाटील यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हेही होते. दोघांच्या अनुपस्थितीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, रविकिरण घोडके, वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 मध्ये नियुक्ती झाली होती. त्याची दीड वर्षांत राज्यातील नवनिर्वाचित शिंदे सरकारने बदली केली आहे. त्यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. त्यांच्या जागी साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह गुरुवारी सायंकाळी महापालिकेत दाखल झाले.
शेखर सिंह हे 2012 च्या बॅचचे अधिकारी आहेत. देश पातळीवर त्यांचा 306 वा क्रमांक होता. सिंह हे आयआयटी गुवाहटीचे (इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी) पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शाखेची पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.
नागपूरचे सहायक जिल्हाधिकारी, रामटेकचे प्रांताधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारीपदाचा त्यांचा बराचसा कार्यकाळ करोनामध्ये गेला आहे. त्यांनी करोना महामारीच्या कार्यकाळात चांगले कार्य केले आहे.




