वाकड (प्रतिनिधी) वाकड गावचा पिंपरी चिंचवड शहरात समावेश झाला. मात्र गेल्या १८ वर्षांत येथील समस्या ‘जैसे थे’ आहेत. नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. पदपथ, रस्त्यावर फेरीवाले आणि दुकानदारांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केले आहे. मोकळ्या जागा आणि रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग आणि महावितरण कडून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी वाकडला पुन्हा ‘गाव’ घोषित करा, अशी मागणी काही नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असलेल्या १२ गावांचा २००४ मध्ये महापालिकेत समावेश झाला. मात्र गेल्या १८ वर्षात येथील कारभारामध्ये फारसा फरक पडलेला नाही. शेतीच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र असे करत असताना येथील नागरिकांना पुरेसा पाण्याचा पुरवठा केला जात नाही. यामुळे सोसायटी धारकांना लाखो रुपये दरवर्षी टँकरच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात.
दत्त मंदिररोड आणि वाकडच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. महापालिकेची अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पुन्हा अतिक्रमणे उभे राहतात. यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना काहीही पडलेले नाही असेच काहीशे चित्र आहे.
वाकड परिसरात बेशिस्त वाहन चालक मनमानी पद्धतीने पार्किंग करतात. अशा वाहन चालकांवर जरब बसेल अशी कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जात नाही. यामुळे वाकड परिसरात वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोळ झालेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सोसायटी धारकांना एसटीपी प्लांट चालविण्याबाबत सक्ती करत आहे. तसेच कचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई देखील केली जाते. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. अशा अनेक समस्यांमुळे स्थानिक नागरिकांनी आपला पूर्वीचा वाकड गाव बरा होता अशा प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत.




