पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील कै. विशाल (पिंटु ) बाळासाहेब यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग कंपनीच्या लगत असलेल्या पवार वस्ती, हरगुडेवस्ती कुदळवाडी, चिखली या ठिकाणी भंगार व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. हे साहित्य हटविण्यास सांगितल्यास शिवीगाळ, अरेरावीची भाषा केली जात असल्याची तक्रार करत ही अनधिकृत बांधकामे तत्काळ काढण्याची मागणी आपुलकी ज्येष्ठ महासंघाने केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिका-यांना निवेदन दिले आहे. त्यात महासंघाने म्हटले आहे की, कुदळवाडीतील कै. विशाल (पिंटु ) बाळासाहेब यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग कंपनीच्या लगत पवारवस्ती, हरगुडेवस्ती कुदळवाडी, चिखली या ठिकाणी भंगार व्यावसायिकांकडून अत्यंत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. सर्रासपणे अनधिकृत बांधकामे चालू आहेत. अनधिकृत बांधकामाचे साहित्य ये-जा करणा-या रस्त्यांवर टाकले जाते. त्यामुळे नागरिकांना ये-ज -जा करताना अडचण येते.
दिवस रात्र बांधकाम चालू असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अनधिकृत बांधकाम करणा-यांना हे साहित्य काढण्यास विनंती केली असता त्यांच्याकडून शिवीगाळ व अरेरावीची भाषा वापरली जाते. व्यावसायिक रात्रीच्या वेळी प्लास्टिक व रबर जाळतात. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणत वायु प्रदुषण होते. आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे त्वरित काढावीत. नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी ज्येष्ठांच्या महासंघाने महापालिकेकडे केली आहे.




