पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयाकडून विद्युत खांब किंवा इतर मोक्याच्या ठिकाणी लावलेले जाहिरात फलक काढून टाकले जातात. मात्र काही दिवसांमध्ये अशीच स्थिती पुन्हा निर्माण होते. यामुळे महापालिकेने शहर विद्रुप करणाऱ्या फुकट्या जाहिरातदारांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मार्ट सिटी म्हणून आता शहराची ओळख होत आहे. अर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून रस्त्याच्या सुशोभिकरणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे. असे असताना ही फुकट्या जाहीरातदारांमुळे शहराचे पुन्हा विद्रुपीकरण होत आहे. रस्त्याच्या मध्ये किंवा कडेला असलेल्या विद्युत पोलवर तब्बत पाच-पाच कापडी जाहीरात फलक लावले जात आहेत. विशेष म्हणजे हे फलक पूर्णपणे फाटल्यानंतरही अद्याप महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही. काहीवेळा फलक काढून नेल्यावर त्याठिकाणी पुन्हा अवघ्या काही तासांत फलक लावला जातो.
राजकीय दबावामुळे अनेकदा फलकांकडे दुर्लक्ष केले जाते. काळेवाडीतील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लावल्यानंतर अवघ्या काही तासांत काढले गेले. मात्र नगरसेवकाने लावलेल्या फलकाबाबत त्याच कार्यकर्त्याने तक्रार करूनही चार दिवस फलक काढले नाहीत. त्यामुळे त्या कार्यकर्त्याने महापालिकेवर दुजाभावाचा आरोप करीत व क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत तक्रार केली.
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांनी चिलेकरनगर, वाकड येथील फलकांबाबत महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली. याठिकाणी असलेल्या एकाच विद्युत खांबावरील पाच कापडी फलक पूर्णपणे फाटले असून त्याचे कापड लोंबकळत आहे. याठिकाणी किमान सहा महिने कारवाई झाली नसावी, असेच चित्र शहराच्या इतर भागातही आहे. येथील फलक काढले नाहीत तर याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करू, अशी तंबी त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.




