पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाख असल्याचे बोलले जात आहे. आत्तापर्यंत ३० लाखांहून अधिक नागरिकांनी करोनाची चाचणी केली. त्यामध्ये सुमारे १२ टक्के नागरिक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
पिंपरी चिंचवड शहरात ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुण सापडला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला महापालिका कोणत्या परिसरात करोनाचे किती रुग्ण सापडले याबाबतची माहिती देत होते. करोना आपल्या घराजवळ आल्याची भिती नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. मात्र नागरिकांच्या मनातील भिती वाढत असल्याने महापालिकेने ही माहिती देणे बंद झाले. त्यानंतर दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. अखेर शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळाही ऑनलाइन सुरू झाल्या. आजही काही कंपन्यांचे काम वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
शहरात ३० लाखांहून अधिक करोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने नागरिक काहीचे बेफिकिर झाल्याचे दिसून येते. आत्तापर्यंत तपासणीच्या सुमारे १२ टक्के म्हणजे तीन लाख ६९ हजार ८०० हून अधिक रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.. तर आत्तापर्यंत चार हजार ६२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत तीन लाख ६५ हजारहून अधिक जण करोना मुक्त झाले आहेत. बाजारपेठेत गर्दी असली तरी मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, हे कमी की काय म्हणून स्वाइन फ्लूनेही डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात डेंग्यूनेही डंक मारला आहे. गेल्या अडीच महिन्यात डेंग्यूचे ७१ सण आढळून आले आहेत.




