पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे सर्व मोठे रस्ते यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिनने) सफाईच्या कामात अनेक राजकारण झाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र, राज्यात पुन्हा भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत या निविदा प्रक्रियेला पुन्हा रुळावर आणले. शहरातील चार विभागांनुसार असलेल्या पॅकेजसाठी प्रत्येकी ३ निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदेच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरच पात्र ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. त्या कामासाठी ७ वर्षांसाठी ३६२ कोटी ४ लाख खर्च अपेक्षित आहे.
तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापासून यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईची निविदा रखडली आहे. तसेच, सर्वसाधारण सभेत अनेकदा तो प्रस्ताव तहकूब करून दप्तरी दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावात अनेक बदलही करण्यात आले होते. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांनिहाय आठ भागात, नंतर चार भाग करून व शेवटी दोन भाग करण्यात आहे. महापौर उषा ढोरे यांच्या कार्यकाळातील शेवटच्या सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.
मात्र, प्रशासकीय राजवटीत आयुक्त राजेश पाटील यांनी या तहकूब विषयाला २९ मार्च २०२२ ला प्राधान्याने मंजुरी दिली. त्यात दोन भागाचे चार भाग करण्यात आले. शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफ केले जाणार आहेत. शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. या कामाची निविदा आरोग्य विभागाकडून १९ जुलै २०२२ ला प्रसिद्ध करण्यात आली. निविदेत चार विभाग करण्यात आले आहेत. त्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत निविदा स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये चार विभागासाठी प्रत्येकी ३, असे एकूण १२ निविदा पालिकेस प्राप्त झाल्या आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठेकेदारांना वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.
दक्षिण भागासाठी ३३१ किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी ३३९.१५ किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व १८ मीटरपेक्षा अधिक रूंदीचे रस्ते तसेच, मंडई व इतर मोकळ्या जागांचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकाराचे प्रत्येकी १६ वाहने आणि प्रत्येकी १९१ चालक, ऑपरेटर, सफाई कामगार व मजूर नेमले जाणार आहे. या सात वर्षांच्या कामासाठी एकूण ३६२ कोटी ४ लाख खर्च अपेक्षित आहे




