लक्ष्मी पावलांनी गवर आली माहेराला… गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला… भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली… पानाफुलांनी बहरली… अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे घरोघरी आगमन झाले आहे. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गणपती बाप्पाचे आगमन झाले की पाठोपाठ आई गौराईदेखील माहेरपणाला म्हणून भक्तांच्या घरी येते. दोन दिवस राहून पती शंकरोबासोबत पुन्हा आपल्या कैलासावर जाते. या परिवार दैवतांच्या पूजेअर्चेने घराघरांतील वातावरण मांगल्याने भारून गेले आहे.
यंदा गणपती बाप्पांच्या नंतर तीन दिवसांनी गौराईचे आगमन झाले. यानिमित्ताने दारात रांगोळी सजली. गणपती शेजारी देवासाठी आरास सजली आहे. घराघरांतील सुवासिनी महिला व कुमारिका यांनी पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन तेथे कळशीत गौराईचे डहाळे पूजन केले. काल आणि आज गौराईच्या गीतांवर फेर धरून गौरी गीते गात या पारंपरिक सणाचा आनंद लुटला.
अशा जलाशयांच्या ठिकाणी गर्दी केली होती. नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा नखरा, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीच्या डहाळ्यांचे पूजन केले.
पूजनानंतर घरात पाऊल ठेवताना गौरी आली, काय काय लेवून आली, काय घेऊन आली? अशा प्रश्नांना उत्तर देत तिच्या आगमनाने सुख-समृद्धी आल्याचे सांगत गणपती शेजारी गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली.




