देहूगाव ( वार्ताहर ) देहूगाव येथील माऊली सोसायटी, भीमाशंकर सोसायटी,सदगुरू सोसायटी, विश्वगाथा सोसायटी, अभंग सोसायटी या परिसरामध्ये गेली चार दिवसांपासून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाले होते. ऐन गडचोत्सवात गणेशोत्सवामध्ये झालेल्या अंधारामुळे संतप्त झालेले सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिकांनी महावितरणच्या देहू येथील विभागीय कार्य़ालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मोर्चात महावितरणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मात्र पोलीस यंत्रणा तात्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, बांधकाम सभापती योगेश काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, राहूल कुऱ्हाडे, कल्पना पिसाळ,विनोद जोशी,अनिल काळे,शरद पवार, रमेश डोंगरे, मुरलीधर तायडे,ज्योती तायडे,सविता पंडीत,मनिषा चौधरी,मारुती पाटील,सुरेंद्र शर्मा,सुरेश गावडे,देवा गिरी यांसह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना नगराध्यक्षा चव्हाण यांनी निवेदन दिले.
त्यानंतर महावितरणाचे चौधरी यांनी परीसराची पाहणी केली. महावितरणाकडून विद्युत केबल उपलब्ध न झाल्याने नादुरुस्त केबल तात्पुरते जोड लावले जात असल्याने वारंवार केबल नादुरुस्त होत होते. गणेशोत्सवचा सण असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नगरपंचायतीच्या वतीने तात्काळ १४० मीटर लांबीचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे विद्युत केबल उपलब्ध करून महावितरणाला देण्यात आले.त्यानंतर महावितरणाच्या कर्मचाऱ्याकडून विद्युत केबल टाकण्यात येत होते.




