पिंपरी दि. ७ सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उद्या गुरूवारी (दि. ८) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.
अजितदादा गुरूवारी दुपारी काळेवाडीत येणार आहेत. सुरुवातीला माजी नगरसेवक विनोद नढे यांच्या आईंचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या घरी जावून नढे परिवाराची सदिच्छा भेट घेतील. त्यानंतर त्यांचा शहरातील गणेश मंडळांना भेटीगाठींचा दौरा सुरु होणार आहे. तो रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. एकाच दिवशी ते शहरातील ३० हून अधिक लहान मोठ्या गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान गणेश मंडळांच्या आरतीसह उत्सवातील इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीकडून समोर आली आहे.




