चिखली : चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, सानेचौक, मोरेवस्ती आदी परिसरातील आज सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिक आणि मंडळांनी विसर्जन घाटावर मोठी गर्दी केली होती. चिखली गावातील इंद्रायणी नदी घाटावर नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
लहान मुलांसह, अबाल वृद्धांनी व महिलांनी विविध स्पर्धा, नृत्य केले तर काही वारकरी परंपरा जपत भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. सोसायटीमधील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. डीजेच्या तालावर लहानथोरांनी न्रत्य करत गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता….भाविकांनी घाटावर आरती करून गणरायाला निरोप दिला.
चिखली परिसरातील नागरिकांनी आज अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती गणपती बापाला निरोप दिला. परिसरातील गणपती मंडळांनी डीजे, झांज पथक, ढोल पथकावर ठेक धरत मोठ्या आनंदी आणि मंगलमय वातावरणात गणरायाला निरोप दिला. मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. परंतु यावर्षी निर्बंध शिथिल केल्याने गणेश भक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण होते.
.




