बीड 09 सप्टेंबर : बीडच्या परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच संतापले. ‘उतर खाली..तो कॅमेरा काढून टाक..जिरवली तुम्ही आमची’, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी कॅमेऱ्यावरून चांगलाच संताप व्यक्त केला. तर यावेळी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी समोर बसलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत महाराजांना शांत केलं.
गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर नाथ प्रतिष्ठानने रात्री इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवले होते. यावेळी कीर्तन करण्यासाठी इंदुरीकर महाराज उभे राहिल्यानंतर कॅमेरा पाहताच ते संतापले. ‘ऐ उतर रे खाली..तो कॅमेरा काढ…जिरवली तुम्ही आमची..ते अगोदर खाली काढ..काढून घे अगोदर’ असं इंदुरीकर म्हणू लागले. इतक्यात एकाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संताप अधिकच वाढला.



