पिंपरी – पिंपरी चौकात गणपती विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून 13 लाखांचे दागिने आणि 50 हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे ही मिरवणूक पाहणे चांगलेच महागात पडले आहे. ही घटना शनिवारी (दि. 10 ) मध्यरात्री साई चौक, पिंपरी येथे उघडकीस आली.
अजय मख्खनलाल बजाज (वय 49, रा. साई चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सर्वजण शुक्रवारी (दि. 9) रात्री आठ वाजता कुलूप लावून गणपती विसर्जन मिरवणुकीत गेले. गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर शनिवारी (दि. 10) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ते घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. फिर्यादी बजाज यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरातील कपाटातून 13 लाख 35 हजार रुपयांचे सोने आणि 50 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.




