पिंपरी, प्रतिनिधी : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे आयोजित नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, 1955 उमेदवारांनी या नोकरी महोत्सवात सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधासभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मुक्तांगण लॉन्स येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते झाले. यावेळी महारष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूआण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम, संचालक प्रा. महादेव रोकडे, विश्वनाथ शिंदे, अर्जुन शिंदे, प्रदीप गायकवाड, मेक्याट्रिक एचआर कंपनीचे व्यवस्थापक दीपक शर्मा, पंकज मालवीय, उदय ववले, किशोर जगधने, तसेच 35 कंपन्यांचे एचआर आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील नामांकित सहभागी 35 कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जागेवर उमेदवारांची मुलाखत घेऊन 900 जणांना जॉइनिंग लेटर दिले. यामध्ये पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवीतील तरुण, तरुणी, महिलांना प्राधान्य देण्यात आले.
सहभागी उमेदवारांना मार्गदर्शन करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, की शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचार करून करिअरचे क्षेत्र निवडावे. मात्र, मानसिकदृष्ट्या खचून न जाता मार्गक्रमण करावे. एखादवेळी नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी चुकीचा निर्णय घेऊ नका. आई वडिलांशी संवाद साधून मन मोकळे करत निर्णय घ्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयराज कॉलनी मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक जगताप, शैलेश दिवेकर, अतुल ससाणे, राजू कोतवाल, नितीन कोल्हे, अनंत दिवेकर, शुभम भोसले, अजिंक्य जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश दिवेकर व प्रा महादेव रोकडे यांनी केले.




