नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी मागच्या दाराने सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करते आहे अशी टिप्पणी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यावरून कॉंग्रेसचे नेते भडकले आहेत. मात्र केजरीवाल कोणत्या संदर्भाने हे बोलले ते समजून न घेता या लोकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.
गुजरातमध्ये केजरीवालांना विचारण्यात आले की राज्यात जर आपचे सरकार आले तर तुम्ही मेधा पाटकर यांना मुख्यमंत्री बनवणार अशी चर्चा आहे. ते खरे आहे का? यावर केजरीवाल कुत्सीतपणे म्हणाले, मी असे म्हणतो की भाजपला मागच्या दाराने सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. आता त्यांना पराभव दिसू लागला असल्यामुळे ते असे तर्क लढवत आहेत. मात्र त्यामुळे गुजरातच्या जनतेचे भले होणार नाही.
वास्तविक ज्याप्रमाणे भाजप सोनियांना पंतप्रधान करू शकत नाही, त्याप्रमाणे आपण पाटकरांना गुजरातच्या मुख्यमंत्री करणार नाही असे त्यांना सूचवायचे असेल. मात्र कॉंग्रेस नेत्यांना हा त्यांचा बोलण्याचा प्रकार पचनी पडला. त्यामुळे केजरीवालांवर टीका करताना कॉंग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की केजरीवालांचे काहीतरी बिनसले आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधानच व्हायचे असते तर त्या दोन वेळा झाल्या असत्या. पण तत्वांशी फारकत घेणाऱ्या, सत्तेची लालसा असणाऱ्या आपच्या लोभी लोकांना हे समजणार नाही. त्यांची समस्या गंभीर दिसते.



