मुंबई : राज्यात शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपाचे हिंगोलीत चांगलेच पडसाद उमटले होते. शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी आज हिंगोलीमध्ये कार्यकर्त्यांसाठी उत्साह वाढविणारा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर लावण्यावरून खोचक शब्दात टीका केली आहे, शिवसेना पक्षप्रमुख आमचे नेते आहेत, आमचे तारणहार आहेत, म्हणणाऱ्या गद्दारांनी स्वतःच्या घराच्या पुढे लावलेल्या पाटीवरील बापाचे नाव काढून शिवसेनाप्रमुखांचे नाव लावले पाहिजेत, तुम्ही स्वतःच्या बापाचे नाव काढून बाळासाहेबांचे नाव लावल तरच तुमची निष्ठा आम्हाला दिसेल, तुमची निष्ठा आम्हाला पाहायची आहे, अशा शब्दात टीका केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात प्रथम आमदार संतोष बांगर व नंतर खासदार हेमंत पाटील हे दोघे शिंदे गटात दाखल झाले. हे दोन लोकप्रतिनिधी गेल्यानंतर जिल्हा शिवसेना कमकुवत होत असल्याचे चित्र रंगवले जात होते. अशात संपर्कप्रमुख म्हणून जिल्ह्याची जबाबदारी बबनराव थोरात यांच्यावर आली. थोरात यांनी सूत्र स्वीकारताच पक्षाची गळती थांबली व इन्कमिंग सुरू झाली.
काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे व अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांना एकाच दिवशी प्रवेश घेऊन शिवसेनेने विरोधकांना चांगला धक्का दिला. दरम्यान येणाऱ्या नेत्यांना मोठा सन्मान मिळत असल्याची नाराजी काही जुन्या कार्यकर्त्यांना दाखविली होती. या कार्यकर्त्यांना लगेच मुंबईत बोलावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते समजूत घालण्यात आली. त्यामुळे पक्षातील नकारात्मक सुरतुर बंद झाले आहेत.



