नवी दिल्ली : मनमानी राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वत: ट्रम्प यांनी वेळोवेळी तसे संकेत दिल्यामुळे या चर्चांना बळकटी मिळते आहे. मात्र यामुळे त्यांच्या स्वपक्षीय, रिपब्लिकन पक्षातील विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे, तर सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष याचे भांडवल करण्याच्या प्रयत्नात आहे.
निवडणूक लढण्याबाबत काय म्हणाले ट्रम्प?
अलिकडेच एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी २०२४ची अध्यक्षीय निवडणूक लढण्याचे पुन्हा संकेत दिले. “मी निवडणूक लढावी, असे अनेकांना वाटते आहे. याबाबत माझा निर्णय झाला आहे. योग्य वेळी मी त्याबाबत घोषणा करेन” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वीही टेनेसीमधील एका सभेत “मी अध्यक्षीय निवडणूक लढलो तर किती जणांना आवडेल?” असा सवाल केला होता. तर सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘२०२४ मध्ये आपलेे सुंदर व्हाईट हाऊस परत घेण्याची’ शपथ त्यांनी घेतली होती. असे वारंवार संकेत द्यायचे, मात्र अधिकृत घोषणा करायची नाही. यामागे ट्रम्प यांची कोणती चाल आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.



