वडगाव मावळ : वेदांता ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होता. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रासह मावळातील लाखो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केले आहे, असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. परंतु कंपनीने महाराष्ट्राला पसंती देखील दिली होती. पण अचानक हा प्रकल्प गुजरात मध्ये कसा काय गेला? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मावळमध्ये होणारा वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यामुळे महाराष्ट्रासह मावळातील भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला. याचा निषेध करण्यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव मावळ येथे ‘निषेध मोर्चा’ काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या व मावळ मावळतील अनेक युवक व नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.
यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले की, तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंपनीच्या शिष्टमंडळा सोबत तीन वेळा बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारकडून वेदांता ग्रुपच्या अटी-शर्ती व सवलती मान्य करण्याबाबत चर्चाही झाली होती. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करून आंबळे एमआयडीसी हेच ठिकाण योग्य असल्याचा अभिप्राय दिला होता. असे असताना हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातो कसा असा सवाल उपस्थित केला.
- औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान
चाकण-तळेगाव एमआयडीसी मध्ये अनेक प्रकल्प आजपर्यंत आले. त्यात जेवढी गुंतवणूक, रोजगारनिर्मिती झाली असेल, तेवढी गुंतवणूक व रोजगार निर्मिती ही या एकाच प्रकल्पातून झाली असती. एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे मावळातील एखादा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यास हे सरकार कारणीभूत ठरले. ही गोष्ट मावळची सुज्ञ जनता कधीही विसरणार नाही.
- प्रकल्पामुळे मावळची जागतिक स्तरावर वेगळी ओळख असती
आंवळे एमआयडीसी मधील सुमारे अकराशे एकर जागेची निश्चिती देखील करण्यात आली होती. या भागात उपलब्ध होणारे कुशल मनुष्यबळ पुरवठा साखळी अशा जमेच्या बाजू होत्या. याशिवाय पुणे-मुंबई शहरे जवळ असल्याने त्याचा फायदा देखील कंपनीला झाला असता. या प्रकल्पामुळे मावळची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली असती. तसेच या प्रकल्पामुळे सुमारे दोन लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. असे बैठकीतील सादरीकरण वेळी सांगण्यात आले होते असे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.




