चांदखेड : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.ओझोन वायूचे महत्त्व व संरक्षण याबाबत जनजागृती व्हावी म्हणून १६ सप्टेंबर १९९५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.पृथ्वीपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा ओझोन वायूचा थर हा मानवाच्या व सर्वच सजीव प्राणीमात्रांच्या दृष्टीने महत्त्वाचा व उपयुक्त आहे. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे जर पृथ्वीवर थेट पोहोचली तर त्याचे विपरीत परिणाम मानवाला व संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावे लागतील. मानवाने केलेल्या चुकांमुळे प्रदूषणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ होत आहे.
या सर्व समस्यांमुळे ओझोन वायूचा थर दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.याचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरण वाचविणे तसेच जास्तीत जास्त झाडांचे रोपण करणे हे गरजेचे आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी हा कार्यक्रम विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी पोस्टर निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लहान गटात कु. चांदेकर रुचिता, चि. तावरे धीरज, कु.माने ज्ञानेश्वरी या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक पटकविले तर मोठ्या गटात कु.शेख सानिया,कु. शेडगे मयुरी व चि.वार्डे यश या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक पटकविले.
तसेच या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते विद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा भोसले यांनी भूषविले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये पर्यावरण तसेच त्याच्या संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आगळे श्रावणी हिने तर आभार प्रदर्शन चि. कदम साहिल या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण कु. वेदश्री वाजे या विद्यार्थिनीने केले. कु.चांदेकर रुचिता,चि.केदारी वेदांत व जाधव रिया या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यामध्ये त्यांनी ओझोन वायूचे महत्त्व तसेच पर्यावरणाचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी विद्यालयातील जेष्ठ अध्यापक सत्यवान पवार, विज्ञान शिक्षक अनुक्रमे पांडुरंग खांडवी व माधवी फापाळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास विद्यालयातील जेष्ठ अध्यापिका शुभांगी पवार,सुकेशनी लोंढे, सरला भोये, तृप्ती विरणक, हनुमंत झांजरे, सदाशिव मधवे, तरुणा सुपे, युवराज शेलार, वैशाली पवार, अनुजा गोपने व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




