पिंपरी (प्रतिनिधी) तळेगाव चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील ५४ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी एकूण १० कोटी २६ लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर पुणे सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. लवकरच ही निविदाप्रक्रिया पूर्ण होऊ महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अजुन किमान वर्षभर तरी या रस्त्यावरून खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो.

वडगाव तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गावरील अवजड वाहतून अहोरात्र सुरु असते, राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा होऊन जवळपास पाच वर्षांनी अखेर तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा ५४ किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे.
यासंदर्भातील हस्तांतरण अधिसुचना भारतीय राजपत्राद्वारे ११ जुलैला प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सुरु होईल आणि रस्ते कामाची निविदा निघेल, असे प्रशासनकडून सांगण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रस्त्याच्या देखभालीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक ए. टी. गोरड यांनी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीला लिहीलेल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावरील खालुंब्रे, म्हाळुगे, खराबवाड़ी, चाकणचौक, शिक्रापूर रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून, याठिकाणाहून वाहने चालविणे धोकादायक झाले आहे. खड्डे चुकविताना वानचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. अशा आशयाचे निवेदन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना दिले होते. दरम्यान, महामार्गाच्या लांबीपैकी या ५४ किलोमीटर अंतराच्या डागडुजीसाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.




