पिंपरी (प्रतिनिधी) – किकबॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने जयपूर, राजस्थान येथे आयोजित किकबॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून २१० खेळाडूंचा संघ नुकताच नागपूरकडे रवाना झाला. खेळाडूंना महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड शहरातून १३ खेळाडुंचा यामध्ये समावेश आहे.
जयपूर मधील एसएमएस स्टेडियम येथे कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर गटातून होणाऱ्या किकबॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील वेगवेगळ्या राज्यातून संघ दाखल झाले आहेत. जयपुर येथे होणाऱ्या सामन्यात २१० खेळाडूंचा संघ या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या खेळाडूंची सुरूवातीला आळंदी येथे २२ ते २४ जुलै दरम्यान राज्यस्तरीय निवड चाचणी घेतली. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील १३ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निलेश भोसले, महेंद्र राजे, नितीन कदम हे जबाबदारी बजावणार आहेत. पंच म्हणून संतोष खंदारे व मंदार पनवेलकर हे जबाबदारी पार पाडणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडु सर्वोत्तम कामगिरी करतील, असा विश्वास महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.




