मुंबई – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला काल उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात सध्याच्या सरकारबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आमदार अपात्र ठरले यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेदेखील नाव आहे जर ते अपात्र झाले तर हे सरकारदेखील कोसळेल असे बापट यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उल्हास बापट बोलत होते. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत दिलेला निर्णय कायद्याला धरून असल्याचे देखील बापट यांनी सांगितले.
लोक जे बाहेर पडलेत ते अपात्र व्हायला हवेत असा माझा अभ्यास मला सांगतो. सुप्रीम कोर्टाने २७ तारखेला निकाल देणे अपेक्षित आहे. काल शिवसेनेला मिळालेली परवानगी ही घटनेला धरून आहे. जर शिंदे गटाने कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचे निरीक्षण नोंदवले जाते. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवते मात्र कालचा दसरा मेळाव्याबाबत निर्णय घटनेला धरून आहे, असेही बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.


