
वाकड – येथील चोंधे पाटील पथ रस्त्यावर बुधवारी (ता. २८) रात्री साडे सातच्या सुमारास चालत्या कारने अचनाक पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील दोघे बापलेक खाली उतरल्याने सुदैवाने ते थोडक्यात बचावले. घटनास्थळी दाखल झालेल्या रहाटणी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
या घटनेनंतर काही काळ मोठी वाहतुक कोंडी झाली होती तर बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. वाकड पोलीस व सांगवी वाहतूक पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक पूर्ववत केली. याबाबत माहिती अशी, विनायक जगगनाथ बोडके (रा. विशाल नगर) हे त्यांच्या मुलासोबत एमएच १४, सीसी ६६७८ ह्या क्रमांकाच्या स्कोडा कंपनीच्या लॉरा कारने घरी चालले होते तेवढ्यात इंजिनमधुन फट असा आवाज आल्याने त्यांनी कार थांबवून दोघेही खाली उतरतले.
तेवढ्यात काही कळण्याच्या आतच सेकंदात कारने खालून पेट घेतला. पाहता पाहता अवघ्या दहा मिनिटांच्या आत संपूर्ण कार जळून खाक झाली. सर्वत्र धुराचे लोळ पसरले. ही आग शॉट सर्किटमुळे झाली असावी असा अंदाज रहाटणी अग्निशामक केंद्राचे लिडिंग फायरमन अशोक इंगवले यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.




