पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.
बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त श्री.शिंदे यांनी दिले. पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.




