लोणावळा (प्रतिनिधी) आगरी कोळी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळातील आई एकवीरा देवी मंदिर व लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी सुमारे ३९ कोटी ४३ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्यामुळे आता गड व परिसरात कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकवीरादेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. नवरात्रोत्सवात तर ही संख्या अनेक पटीने वाढते. मात्र, गडावर जाण्यासाठी वाहतूक साधने व मूलभुत सुविधांची कमतरता आहे. स्थानिक प्रशासन व एकवीरा देवस्थानच्या वतीने मुलभुत सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो. मात्र या सर्व बाबी तात्पुरत्य स्वरूपात असल्याने, येणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे याठिकाणीविकासकामे करण्याची भाविकांची जुनी मागण हिोती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळाच्या सन २०२० रोजीच्या हिवाळी अधिवेशनात आभाराच्या भाषणात केलेल्या घोषणेनुसार व दि. २३ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने प्राचीन मंदिरे, लेण्या संवर्धन करण्याबाबत बृहत विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि.३० डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील ८ प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आगरी-कोळी बांधवांचे कुलदैवत, आपल्या मावळ तालुक्यातील कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिराचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सुमारे १०१ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी मावळातील कार्ला येथील आई एकवीरादेवी मंदिर व लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी सुमारे ३९ कोटी ४३ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पहिल्या टप्प्यात मंदिराचे जतन व संवर्धनावर भर दिला जाणार आहे. त्यानंतर आगामी काळात रोप वे, भक्त निवास व आवश्यकतेनुसार भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सरकारकडे पाठपुरावा करुन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास कटिबद्ध असेल.
-सुनील शेळके, आमदार




