तळेगांव स्टेशन (संदीप गाडेकर) पुणे जिल्हा मध्यामिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी तसेच पु. जि. माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांना नुकताच जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. भोर या ठिकाणी झालेल्या जाहिर कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे, जी. के. थोरात आणि के. एस्. ढोमसे, वसंतराव ताकवले यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.
सौ. स्नेहल बाळसराफ यांनी गेली पंचवीस वर्षे माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेचे नेतृत्व केले असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी माध्यमातून पुणे ,मुंबई आझाद मैदानावरील धरणे, मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने आग्रही भूमिका घेत आहे.
तसेच मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघातून एकमेव महिला अध्यक्ष म्हणून विधायक कामाचा ठसा उमटविला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संघटनेमार्फत शिक्षकांच्या कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शने, शिक्षक प्रबोधन वर्ग इ. माध्यमातून शिक्षकांना अचूक मार्गदर्शन करून मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची प्रतिमा उंचावली आहे. शिक्षकांनी आत्मकेंद्री न राहता समाजोभिमुख राहून नवी पिढी घडविण्यासाठी कटिबध्द असले पाहिजे यावर त्यांचा भर असतो.
महाराष्ट्राच्या विविध भागात विनामोबदला व्याख्यानातून सावित्रीबाईंचे कार्याची ओळख करून देत असून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक नृत्य इ. क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती म्हणून सौ. बाळसराफ यांना शासकिय, शैक्षणिक व सामाजिक संस्थाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सौ. स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.




