हिंजवडी : कचरा व्यवस्थापन ही पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या शेजारी असलेल्या गावांची मोठी समस्या आहे. अनेक ग्रामपंचायती त्यावर उपाय म्हणून लाखो रुपये खर्च करतात. मात्र, आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायत वर्षाकाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून देखील कचरा रस्त्यावरच पडलेला दिसून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हिंजवडी ग्रामपंचायतच्या कचरा व्यवस्थापनाचा ‘दोन खोके, एकदम ओके’ हा पॅटर्न राबवला जात असल्याची चर्चा होत आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या ठेक्यानुसार दररोज दोन किलोमीटर रस्ते झाडले जातात. वर्षभरातील एकूण सातशे किलोमीटर रस्ता झाडण्यासाठी ७४ लाख रुपये खर्च केला जातो, म्हणजेच एक किलोमीटर रस्ता झाडण्यासाठी १० हजार रुपये प्रती दिवस खर्च येत असल्याने यात मोठे गौडबंगाल असून, ही जनतेची मोठी दिशाभूल करण्याच्या हिमनगाचे टोक असल्याचा आरोप करण्यात आला. येथील मुख्य चौकलगत असलेल्या ग्रामसचिवालयाच्या इमारती शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, हिंजवडी येथील शिंदे वस्ती ते फेज १ ला जोडला जाणारा रस्ता ही सार्वजनिक कचराकुंडी असल्याचे चित्र आहे.
मारुंजी-हिंजवडी हद्दीलगत असलेल्या या भागात ग्रामस्थ आणि भाडेकरू मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्याने येथील कचरा समस्या मोठी आहे. यासह लक्ष्मी चौक ते मेझा 9 या रस्त्यालगत एका भंगार व्यावसायिकाने थर्माकोल आणि भंगार देखील टाकले असल्याने ते मागील काही महिने उचलण्यात आले नाही. परिणामी आयटीतील कचरा समस्या अधीक गंभीर होत आहे. आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतच्या कचऱ्याचे मागील कंत्राटदाराचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यास काही महिने लोटले आहेत.
परंतु अद्यापही नवा ठेकेदार नेमण्यात आलेल्या नाही. यात अंतर्गत राजकारणाची किनार असल्याची चर्चा आहे. काही सदस्य नामवंत आणि व्यवस्थापकीय दृष्टीने सक्षम ठेकेदार नेमावा या मताचे आहेत. त्यामुळे यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. तर मागील ठेकेदारास कंत्राट मिळावे यासाठी काही सदस्य आग्रही असल्याने मागील अनेक महिने ही प्रक्रिया रेंगाळली आहे. यामुळे कचरा व्यवस्थापन करण्याची नक्की जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः हिंजवडी ग्रामपंचायत सुमारे २ कोटी रुपये वार्षिक खर्च कचरा व्यवस्थापनासाठी करत आहे. नुकत्याच झलेल्या ग्रामसभेत यावर मोठी चर्चा झाल्याने यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी करण्यात येत आहे.



