पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत इंदोर शहराप्रमाणे स्वच्छतेचा पॅटर्न शहरात सुरू केला. त्यासाठी शहरातील सर्व कचराकुंड्या काढून शहर कचरा कुंडी मुक्त केले. कचरा संकलित करणाऱ्या गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा घेण्यास सुरुवात केली. यासाठी शहरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी ९ कोटींचे ठेकेदारांची नेमणूक केली. झोपडपट्ट्याची रंगरंगोटी, कंपोस्ट बिन्स वाटप या सर्व कामांसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, एवढी कोट्यावधीची उधळपट्टी करूनही शहर स्वच्छ सर्वेक्षणात ‘जैसे थे’च आहे.
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये इंदोर पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे ठरले. त्यानंतर पालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि काही नगरसेवकांनी इंदोरला प्रशासकीय दौरे केले. ओला व सुका कचरा वेगळा देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू झाली. महापालिकेकडून दररोज कचरा संकलन करून मोशी डेपोत नेला जातो. शहरात दिवसाला १,२०० टन कचरा गोळा होतो.
शहरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याबाबत घरोघरी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार संस्थांची नियुक्ती केली. एक वर्षासाठी या संस्थांची नियुक्ती केली असून, त्या मोबदल्यात त्यांना तब्बल १९ कोटी २० लाख ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत.




