नाणे चालतच मोदींचे नाणे राहील – फडणवीसमुंबई : उद्धव ठाकरे यांनी – नरेंद्र मोदी हे घासले गेलेले नाणे आहे अशा आशयाची टिप्पणी केली. त्यावरून आता त्यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत. त्यांच्यावर पहिला हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदी यांचे नाणे चालतच राहील असा दावा त्यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, बहुदा उद्धव ठाकरे यांना विस्मरण झाले असावे. कारण नोटबंदीनंतरच्या सर्व निवडणुका ते मोदी यांच्या नावावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि सर्व आमदार हे मोदी यांचे नाणे दाखवूनच निवडून आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी श्रध्दास्थान आहेत व राहतील. मात्र यापुढेही मोदींचे नाणे चालतच राहील.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ते म्हणाले, गेल्या २५ वर्षांत देशातल्या कोणत्याही राज्यात, कोणत्याही पक्षात फूट पडल्यावर आयोगाने आपल्या अंतरिम आदेशात त्या त्या पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. त्याच्यानंतर सुनावणी होते व कायद्यानुसार ज्या गटाचा अधिकार असतो त्याला ते मिळते. निवडणूक आयोग जेव्हा या विषयावर आपला अंतिम निर्णय देईल तेव्हा एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ चढेल असा आपल्याला विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. .




