पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई करत एप्रिल-मे मध्ये ती हटविण्यात आली होती. त्यानंतर पाच-सहा महिन्यांत पुन्हा त्याच रस्त्यावर त्याच विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याची दिसत आहेत. त्यामुळे शहराला बकालपणा आल्याचे चित्र दिसत आहे.
अनेकदा पुढे अतिक्रमण कारवाई होत असते आणि काही तासांतच पुन्हा त्याच जागेवर तेच दुकान अनधिकृत लावल्याचे चित्र दिसून येते. रावेत, वाल्हेकरवाडी, वाकड थेरगाव, पवारवस्ती, काळेवाडी, पिंपळे सौदागर अशा अनेक भागात अतिक्रमण विभागाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जातो.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत पत्रा शेडवर मोठी कारवाई अभियान राबवले होते. यामुळे अनधिकृत दुकानदाराच्या मनात मोठी धडकी भरली होती मात्र त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा अनधिकृत धद्यांचा सूळसुळाट वाढला आहे. पाटील यांनी शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवून ती नेस्तनाबूत केली होती. रावेत ते वाल्हेकरवाडी रस्त्याच्या कडेला उभी राहिलेले हॉटेल्स, शोरुम्स, नर्सरी, भंगार मालाची दुकाने, मटन व चिकनच्या टपऱ्यांसह हॉटेल पाडले. तसेच मोशी ते भोसरी दरम्यान नाशिक महामार्गालगत व नाशिकफाटा, कासारवाडी या भागात दुकाने पाडली होती. मात्र, आता अनधिकृत बांधकामे, शेड, टपऱ्यांवर कारवाई करत सर्वच परिसरात पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत.




