पुणे (प्रतिनिधी) नोव्हेंबर – २०२१ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल आता आठवड्याभरात लावण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष उत्तीर्ण उमेदवारांच्या ओएमआर शीटची कसून तपासणी करण्यात येत असून ते काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तब्बल वर्षभराने टीईटी’ परीक्षेचा निकाल लागणार आहे. यामुळे उमेदवारांना निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
राज्य सरकारने वर्षातून एकदा तरी टीईटी’ परीक्षा घेण्याबाबतची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र काहीना काही विघ्न आल्यामुळे परीक्षांचे नियोजन सतत कोलमडले होते. त्यात जानेवारी २०२० च्या टीईटी’ परीक्षेतील ७ हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा मोठा घोटाळा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. यात अधिकारी, कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीच्या संचालकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. या घोटाळ्यामुळे ‘शिक्षण विभागाला भ्रष्ट’ कारभाराचे शासनाने किमान गालबोट लागले.
आत्तापर्यंत झालेल्या सर्वच टीईटी’ परीक्षांच्या निकालांची तपासणी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही विविध संघटनांकडून करण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातील ४ लाख ६८ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली होती. परीक्षेतील पेपर क्रमांक १ साठी २ लाख ५४ हजार ४२८ तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० उमेदवारांची नोंदणी झाली होती.



